शिवसेनेनंतर कल्याणात भाजप उतरली रस्त्यावर; पाहा भाजपनं काय दिला सेनेला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:01 PM2021-08-24T19:01:16+5:302021-08-24T19:03:06+5:30
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावरच ठिय्या मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटलेले पाहायला मिळाले. कल्याणात शिवसैनिकांनी भाजप शहर शाखेवर दगडफेक करत भाजपा पदाधिका-याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेनंतर आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावरच ठिय्या मांडला. भाजपाच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध करत यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी दिवसात सेना भाजपमधील वाद विकोपाला पोहचण्याची दाट शक्यता आहे. कोरोना काळात दोन राजकीय पक्षांच्या भांडणामध्ये एकीकडे कोंबड्याचा छळ झाला असून दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दगडफेक आणि मारहाणी प्रकरणी कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा छेडले जाईल असा इशारा सुद्धा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. यापुढे सेनेला जशाच तसे उत्तर दिले जाईल सेनेमध्ये खरी हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहिजे होता असेही म्हात्रे म्हणाले. सेना भाजपमधील हा वाद पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे.