भाजपामध्ये काँग्रेससारखी घराणेशाही नाही- नितीन गडकरी
By admin | Published: February 19, 2017 11:49 PM2017-02-19T23:49:17+5:302017-02-19T23:49:17+5:30
महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. परंतु काँग्रेसमध्ये नेत्यांच्या मुलांना संधी दिली जाते, अशी भाजपात घराणेशाही नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप गोळीबार चौकातील गडकरी यांच्या जाहीर सभेने करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच ते तीन वर्षांत नागपूर शहरात ५० हजार कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहराचा चौफेर विकास होत असून जानेवारी २०१८ पर्यंत नागपुरात मेट्रो रेल्वे धावणार आहे. चार हजार कोटींचा आॅरेंज सिटी स्ट्रीट, तेलंगखेडी व अंबाझरी तलावांचे सौंदर्यीकरण, पाण्यावर उतरणारे सीप्लेन, ७०० कोटींचे सिमेंट रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, एम्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ, असे विकासाचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विकासाच्या बाबतीत नागपूर देशात नंबर वन शहर होईल. परंतु यासाठी केंद्र व राज्य सरकारसोबतच नागपूर महापालिकेच्या इंजिनची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
नागपूर शहरात २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून पाण्याची समस्या मार्गी लागली. लातूर शहराला जेव्हा रेल्वेने पाणी जात होते, तेव्हा नागपुरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत होते. शहरातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते वीजनिर्मिती प्रकल्पासाठी वापरले जात आहे. यातून महापालिकेला वर्षाला १८ कोटी मिळत आहे. पुढील वर्षात पुन्हा ५० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. अशाप्रकारे महापालिकेला वर्षाला ३० कोटी मिळणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मिहान प्रकल्पात ९,८७० लोकांना रोजगार मिळाला आहे. लवकर मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प सुरू होणार असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. व्यासपीठावर माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व गिरीश व्यास आदी उपस्थित होते.