भाजपाला पाठिंबा नाही!
By admin | Published: November 4, 2015 11:59 PM2015-11-04T23:59:30+5:302015-11-04T23:59:30+5:30
महापालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
कोल्हापूर : महापालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेसचे २७, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज आहे. दोन्ही काँग्रेसचे मिळून ४२ सदस्य होतात. दोन अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी महापौर भाजपाचाच होईल, असे सांगत खळबळ उडवून दिली होती. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने तटकरे यांच्याशी संपर्क साधला. दुसरीकडे भाजपासोबत जाणे या ‘जर-तर’च्या गोष्टी आहेत. सध्यातरी याबाबतचा कोणताही विचार केलेला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे शिवसेना आ. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पराभव सेनेच्या जिव्हारी
८१ जागा लढविणाऱ्या सेनेने ‘४१ प्लस’चा नारा दिला, पण त्यांना अवघ्या चार जागा मिळाल्या. पराभवासारखी ही कामगिरी सेनेला जिव्हारी लागली आहे. कोल्हापुरात कुठे कमी पडलो, याचा अहवाल दोन दिवसांत सादर करणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. सेनेला एकूण ४४ हजार ३५४ मते मिळाली. एकत्रित मतदानांच्या तुलनेत ही टक्केवारी १४.२१ इतकी आहे.