न्यायालयीन लढतीत भाजपा वरचढ ठरतंय का?, शरद पवारांच्या उत्तरानं एकच हशा पिकला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:21 AM2022-05-10T10:21:04+5:302022-05-10T10:21:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर भाष्य केलं.
कोल्हापूर-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यात राज ठाकरेंचा अयोध्या दौरा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि राजद्रोहाचा नियम यावर शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं. पण एका प्रश्नावर शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना जामीन मिळतो. मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढतीत भाजपा महाविकास आघाडीपेक्षा वरचढ ठरत आहे का?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.
"कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं? बोलण्यासारखं खूप आहे. पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल", असं पवारांनी उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावेळी राजद्रोहाच्या कलमात बदल करण्यासंदर्भातही आपली भूमिका मांडली. "राजद्रोहाचं कलम १८९० साली इंग्रजांनी आणलं होतं. पूर्वीच्या काळी राजाविरोधात कोणी आवाज उठवला तर या कलमाचा वापर केला जात असे. मात्र आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि सत्तेविरोधात बोलण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे हे कलम आता कालबाह्य असल्याची भूमिका मी मांडली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही याबाबत भाष्य केल्यानंतर केंद्र सरकारने आम्ही या कलमाचा फेरविचार करणार आहोत असं म्हटलं आहे, असं असेल तर ही चांगली बाब आहे", असं शरद पवार म्हणाले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर शिवसेना आणि मनसेमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका वाक्यात उत्तर देत राज ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. "अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही", असं शरद पवार म्हणाले.
"अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जातंय हे मला माहित नाही. पण देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हेच खरे भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत. देशाची सुत्रं आज ज्यांच्या हातात आहेत ते लोक आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा नातू रोहित पवार देखील अयोध्या दौऱ्यावर आहे हे मलाही माहित नव्हतं", असं शरद पवार म्हणाले.
१५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश नाहीत
सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घेण्यात आदेश दिलेले नाहीत हे स्पष्ट करताना शरद पवार यांनी कोर्टाचा नेमका निकाल यावेळी सांगितला. "१५ दिवसांत निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलेलं नाही. निवडणूक प्रक्रियेसाठीच्या तयारीला १५ दिवसांत सुरुवात करा असं कोर्टानं सांगितलं आहे", असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. "निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले.