NCP vs BJP: बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:03 PM2022-09-06T17:03:44+5:302022-09-06T17:04:22+5:30
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित!
NCP vs BJP: भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत मोठं विधान केलं. "राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं", असे बावनकुळे म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य करणाऱ्या बावनकुळेंच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी समाचार घेतला. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु असे स्वप्न भाजपाचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे थेट प्रत्युत्तर त्यांनी दिले.
बावनकुळे सध्या 'मिशन बारामती'च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीने पक्ष बळकटीकरणासाठी कामाला लागला असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना तपासे म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघ राजकारणाने नव्हे तर समाजकारणाने बांधलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा परिचय राजकारणीपेक्षा एक समाजकारणी म्हणून जास्त आहे. राजकारण करण्याची भूमिका भाजपची तर समाजकारणाचे बाळकडू खासदार सुप्रिया सुळे यांना लहानपणापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या प्रेरणेतून मिळाले आहे."
"चंद्रशेखर बावनकुळे हे नव्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याने कार्यकर्त्यांसमोर बोलावं लागतं शिवाय. मिडियासमोर बोललं तर बातमी होते परंतु संपूर्ण महाराष्ट्राला खासदार सुप्रिया सुळे यांचे काम कसे आहे याचा परिचय आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक भाजपा खासदार आहेत. शिवाय सलग सात वेळा संसदरत्न, १६ व्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने खासदार सुप्रिया सुळे यांचा सन्मान करण्यात आला आहे आणि तेही मोदी राजवटीत करण्यात आलाय", अशी आठवण करून देत महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला.