एकनाथ खडसे आणि तावडेंची खलबतं, बंडखोरीवर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 04:25 PM2019-12-04T16:25:29+5:302019-12-04T16:25:52+5:30
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपांतर्गत नेतृत्वाविषयी असलेली नाराजी समोर येऊ लागली आहे.
मुंबईः राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपांतर्गत नेतृत्वाविषयी असलेली नाराजी समोर येऊ लागली आहे. निवडणुकीच्या काळात भाजपानं एकनाथ खडसेंना जाणूनबुजून बाजूला ठेवले. तिकीट न मिळाल्यानं विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनात डावलल्याची भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली आहे. त्या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.
बैठकीत काय चर्चा झाली असे पत्रकारांनी विचारले असता खडसे म्हणाले, पारिवारिक चर्चा झाली. आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. परिवारातल्या सदस्यांना आमंत्रण द्यायला बोलावलं होतं. तसेच भाजपासमोर काहीही आव्हानं नसल्याचाही त्यांनी खुलासा केला आहे. भाजपासमोर काहीही आव्हान नाही, भाजपा पक्ष सध्या तरी एकसंध आहे. पक्षामध्ये एकजूट आहे आणि योग्य वेळी तुम्हाला दिसून येईल. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची काही भेट घेतलेली नाही. पंकजाताईंची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गोपीनाथ गडावर दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. या वर्षीसुद्धा जाणार आहे. सध्या तरी वेगवेगळे मतप्रवाह समोर आलेले नाहीत. मीडियाच्या माध्यमातून बरीचशी माहिती समजल्याचाला टोलाही खडसेंनी लगावला आहे. तर विनोद तावडेंनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, कालच भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपाने केला होता. पण, आम्ही त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला असं त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेंच्या मनात खदखद होती, ती खदखद त्यांनी उघडपणे बोलून दाखवली नाही. पण वर्तमानपत्रातील नाराजीच्या बातम्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या काळात शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी माझी दोनवेळा भेट घेतली.
पण त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही. गेल्या 22 वर्षांची आमची युती आहे, मी 2009 साली नाराज झालो होतो, तेव्हाही माझी नाराजी दूर करून तुम्ही भाजपातच राहिलं पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचं गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. भाजपा-शिवसेना आणि रिपाइं ही युती घडविण्यात तुमची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पण माझ्याच पक्षातील काही लोकं मी शिवसेनेत-काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवत होते, असेही मुंडेंनी त्यावेळी सांगितले होते. तर, गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे जवळचे मित्र असल्याने ते काँग्रेसमध्येही जाणार अशा चर्चा होत्या.