भाजपाची विस्तारक योजना तयार
By admin | Published: May 16, 2017 03:04 AM2017-05-16T03:04:43+5:302017-05-16T03:04:43+5:30
भाजपाचा विचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाचा विस्तार करण्यासाठीची योजना महाराष्ट्र प्रदेश भाजपाने तयार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाचा विचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाचा विस्तार करण्यासाठीची योजना महाराष्ट्र प्रदेश भाजपाने तयार केली आहे.
एक वर्ष वा सहा महिने पक्षासाठी घराबाहेर राहून काम करणाऱ्या १०८ कार्यकर्त्यांची पहिली यादी तयार झाली आहे. या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर अलिकडेच येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाले. व्ही.सतीश, व्ही.संतोष, रवि भुसारी, रामदास आंबटकर या पदाधिकाऱ्यांसह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यात मार्गदर्शन केले.
या विस्तारकांना त्यांच्या तालुक्याबाहेर वा जिल्ह्याबाहेरदेखील पाठविले जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाप्रमाणे ते पूर्णवेळ पक्षासाठी काम करतील. कार्यकर्त्यांच्या घरी जेवतील
आणि मुक्कामही करतील.
कोणताही बडेजाव त्यांच्या
वागण्यात नसेल, असा कटाक्ष घालून देण्यात आला आहे.
या विस्तारकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती असलेल्या पुस्तिका देण्यात आल्या असून त्यांचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. या शिवाय, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याची तसेच त्यांनी जनसंघाची उभारणी केली याची माहिती पुस्तिकादेखील देण्यात आली आहे. विस्तारक योजना पुढील महिन्याच्या शेवटी सुरू होईल. प्रत्येक तालुक्यात एका विस्तारकास पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच आणखी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.