नामनिर्देशित नगरसेवक पदावर भाजपाचे नवे चेहरे

By admin | Published: March 23, 2017 03:17 AM2017-03-23T03:17:17+5:302017-03-23T03:17:17+5:30

नामनिर्देशित नगरसेवकपद मिळवून महापालिकेत मागच्या दराने पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी पराभूत नगरसेवकांचे प्रयत्न अखेर निष्फळ

BJP faces fresh nomination for nominated councilor | नामनिर्देशित नगरसेवक पदावर भाजपाचे नवे चेहरे

नामनिर्देशित नगरसेवक पदावर भाजपाचे नवे चेहरे

Next

मुंबई : नामनिर्देशित नगरसेवकपद मिळवून महापालिकेत मागच्या दराने पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी पराभूत नगरसेवकांचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांना वगळता, भाजपा आणि काँग्रेसने नवीन चेहरेच महापालिकेत पाठवण्याची तयारी केली आहे. या नावांची अधिकृत घोषणा २७ मार्च रोजी महापालिका सभागृहात होणार आहे.
महापालिकेत नामनिर्देशित नगरसेवकांसाठी पाच पदे राखीव आहेत. या पदावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अथवा अभ्यासकांना नेमणे अपेक्षित असते. मात्र, पराभूत नेत्यांचे पुनर्वसन अथवा आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी या पदावर लावण्याची प्रथा गेल्या काही वर्षांमध्ये पडली आहे. त्यामुळे या वर्षीही राजकीय पक्ष आपल्या पराभूत दिग्गज नगरसेवकांना पुन्हा संधी देणार अशी चर्चा होती. तसे प्रयत्नही शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसमधील पराभूत नगरसेवकांनी सुरू केले. संख्याबळानुसार, शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एक नामनिर्देशित नगरसेवकांसाठी राखीव जागा मिळणार आहे.
शिवसेनेतून माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांची नावे चर्चेत होती, तर काँग्रेसमधून शीतल म्हात्रे, प्रवीण छेडा आणि भाजपामधून मंगल भानुशाली आणि भालचंद्र शिरसाट यांचे नाव घेतले जात होते. मात्र, याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर, पारदर्शकतेच्या पाहरेकऱ्यांनी यू टर्न घेतला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांऐवजी गणेश खाणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तसे टिष्ट्वट केले आहे. शिवसेनेच्या वतीने विश्वासराव आणि अरविंद भोसले, तर काँग्रेसकडून सुनील नरसाळे यांचे नाव चर्चेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP faces fresh nomination for nominated councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.