नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत
By यदू जोशी | Published: September 10, 2024 08:23 AM2024-09-10T08:23:57+5:302024-09-10T08:25:08+5:30
आपण सोबतच राहणार! अमित शाह यांनी अजित पवार यांना केले आश्वस्त
यदू जोशी
मुंबई - तुम्ही आमच्या सोबत आहात आणि विधानसभेला सोबतच राहणार आहात, महायुतीत ज्या मुद्द्यांवर एकमत होणार नाही ते माझ्याकडे आणा, मी उपाय करेन, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वस्त केले. दुसरीकडे भाजपच्या किमान ५० उमेदवारांना कामाला लागण्याचे निरोप येत्या १५ दिवसांत व्यक्तिश: दिले जातील. नवरात्र उत्सव सुरू होताच, म्हणजे ३ ऑक्टोबरनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. शाह व भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात दोन महत्त्वाच्या बैठकी झाल्या. सह्याद्री अतिथीगृहावर शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह राज्यातील नऊ प्रमुख भाजप नेत्यांची बैठक रविवारी रात्री घेतली.
अजित पवार गटाच्या फक्त तीन नेत्यांशी शाह यांनी केली चर्चा
अमित शाह यांनी विमानतळावर केवळ अजित पवार गटाच्या तीन नेत्यांशी निवडणुकीबाबत चर्चा केली. अजित पवार हे दोन दिवसांच्या शाह यांच्या दौऱ्यात कुठेही नव्हते. ते महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेच्या दोन मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवार गट महायुतीत राहणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच शाह यांनी विमानतळावरील बैठकीत त्यांना ‘हम साथ साथ हैं, और रहेंगे’, असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती आहे. या बाबत प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एकसंधपणे तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा पुनरुच्चार शाह यांनी बैठकीत केला. त्यामुळे इतर कोणत्याही चर्चांना काहीही अर्थ नाही.
असेही कळते की, जागावाटपाची चर्चा लवकर संपून फॉर्म्युला ठरवावा, अशी विनंती अजित पवार यांनी शाह यांना केली. येत्या दहा-बारा दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
भाजपच्या बैठकीत काय झाले?
ज्या जागांवर वाद होऊ शकतो अशा बाजूला ठेवा. भाजप हमखास ज्या जागा लढणार असे वाटते, त्यांची यादी तयार करून त्यातील किमान ५० टक्के उमेदवारांना तयारीला लागायला सांगा. जेणेकरून त्यांना पुरेसा वेळ मिळेल, अशी भावना एका भाजप नेत्याने सह्याद्रीवरील बैठकीत व्यक्त केली. मात्र, तसे केले तर बंडखोरीची शक्यता आहे, म्हणून कुठेही चर्चा न करता थेट उमेदवारांनाच निरोप द्यायचा, अशी भूमिका ठरल्याचे समजते.
भाजपचे सध्या १०२ आमदार आहेत. एखाददुसरा अपवाद वगळता ‘सिटिंग-गेटिंग’ या फाॅर्म्युल्यानुसार भाजपलाच या जागा मिळतील. ज्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे अशांना आणि गेल्यावेळी अपयश आले, पण यावेळी भाजपच लढणार याची खात्री असलेल्या जागांवरील उमेदवार लवकर ठरवून त्यांना तसे कळविले जाईल. पहिल्या यादीत ५० नावे असतील, असे मानले जाते.