राखीव मतदारसंघांवरही ‘भाजपा’चा झेंडा
By admin | Published: October 23, 2014 03:28 AM2014-10-23T03:28:49+5:302014-10-23T03:28:49+5:30
दलित, आदिवासी, मुस्लिम मते ही कॉँग्रेसची पारंपरिक मते मानली जात होती; पण लोकसभेतील मोदी लाटेने या पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले.
असिफ कुरणे, कोल्हापूर
दलित, आदिवासी, मुस्लिम मते ही कॉँग्रेसची पारंपरिक मते मानली जात होती; पण लोकसभेतील मोदी लाटेने या पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपाने कॉँग्रेसची ही पारंपरिक मते आपल्याकडे ओढली. एवढेच नव्हे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावर देखील ताबा मिळविला आहे. २००९ च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या २८ मतदारसंघांपैकी कॉँग्रेस- सात, भाजपा- सात, राष्ट्रवादी- सहा, तर शिवसेनेकडे आठ मतदारसंघ होते; पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने २८ पैकी अर्ध्या म्हणजे १४ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेने आठ, तर राष्ट्रवादी कॉँग्रसने- तीन मतदारसंघांत विजय मिळविला. कॉँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती मतदारसंघाप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावरदेखील भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. २४ मतदारासंघांपैकी ११ मतदारसंघांवर भाजपाचा ताबा आहे, तर कॉँग्रेस, शिवसेनेला चार- चार मतदारसंघांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीकडे तीन, बहुजन विकास आघाडी आणि माकपकडे प्रत्येकी एक मतदारसंघ राहिला.