नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 03:50 PM2024-09-14T15:50:46+5:302024-09-14T15:51:22+5:30

BJP Girish Mahajan News: एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

bjp girish mahajan reaction over ncp sp group eknath khadse joining bjp party | नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”

नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”

BJP Girish Mahajan News: लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे. केंद्रातील पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे. यातच एकनाथ खडसे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत भाजपा नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

ज्या वेळेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती.  दिल्लीतील अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत असताना  जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. रक्षा खडसे उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात भाजपाचा मफलर घातला. या घटनेला ५ ते ६ महिने होऊन भाजपाने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकुलत्या एक मुलीशी शपथ घेऊन राज्यपालपदाचा शब्द दिला होता. ही गोष्ट २०१९ मधील आहे. अद्याप त्यावर काही झाले नाही, अशी खंत व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केला. पत्रकारांशी संवाद साधत असताना गिरीश महाजन यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

फटाके फोडून स्वागत करु

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहिती नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. 

दरम्यान, मी प्रवेश घेतो असे कधी म्हणालेलो नव्हतो. मला प्रवेश घ्या, असे ते म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन गेलो होतो. ४० वर्षे भाजपाचे काम केले. इतके वर्ष काम केले, पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतके सगळे करून भाजपामध्ये  मला प्रवेश द्या, अशी विनंती करणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली.
 

Web Title: bjp girish mahajan reaction over ncp sp group eknath khadse joining bjp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.