Maharashtra Politics: सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? गिरीश महाजनांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:03 AM2023-01-17T11:03:55+5:302023-01-17T11:04:10+5:30
Maharashtra News: काँग्रेसचे रामभरोसे काम सुरु आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांनी माघार घेतली. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का, या प्रश्नाला गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष शुभांगी पाटील या मूळ भाजपच्या असल्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांचे मन वळविण्यात येईल, अशी चर्चा केली जात असताना पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. नाशिकमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक भाष्य केले.
सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का?
गिरीश महाजन म्हणाले की, त्यांनी पाठिंबा मागितला तर, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे, असे गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले. गिरीश महाजन यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे रामभरोसे काम सुरु आहे
भाजप घरफोडण्याचे काम करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. यावर, तुम्हाला तुमचे घर संभाळता येत नाही. तुमच्या घरातील माणसे तुम्हाला संभाळत येत नाही. सर्वजण बाहेर पडत आहेत. उद्या एकटे नाना पटोलेच पक्षात शिल्लक राहतील, अशी शंका आहे. ते सुद्धा इकडे-तिकडे असताताच. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण राहील, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. काँग्रेसचे रामभरोसे काम सुरु आहे, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"