Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:03 PM2022-07-09T18:03:54+5:302022-07-09T18:06:14+5:30
Maharashtra Political Crisis: मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
जळगाव: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे, त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आरोप-प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातच आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज, मीम्स यांचा आधार घेत एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर पडले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असे अजिबात म्हणणार नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो
सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय झाला. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंविरोधात खोचक टीका केली आहे.