भाजपाच्या काही खासदारांचे तिकीट कापणार? लोकसभेसाठी नवे चेहरे देण्याचा विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 07:23 AM2019-02-03T07:23:13+5:302019-02-03T07:23:43+5:30

२०१४ च्या निवडणुकीत चार ते पाच खासदारांसह किमान आठ ते दहा उमदेवार भारतीय जनता पार्टी बदलेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपात त्यावर विचारमंथन सुरू आहे.

 BJP giving new faces to the Lok Sabha continues | भाजपाच्या काही खासदारांचे तिकीट कापणार? लोकसभेसाठी नवे चेहरे देण्याचा विचार सुरू

भाजपाच्या काही खासदारांचे तिकीट कापणार? लोकसभेसाठी नवे चेहरे देण्याचा विचार सुरू

Next

- यदु जोशी
मुंबई  - २०१४ च्या निवडणुकीत चार ते पाच खासदारांसह किमान आठ ते दहा उमदेवार भारतीय जनता पार्टी बदलेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपात त्यावर विचारमंथन सुरू आहे.
वर्धेचे खासदार रामदास तडस यांना लोकसभेची उमेदवारी न देता सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते. तडस यांचा देवळीमध्ये २००९ मध्ये ३,७४६ मतांनी पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी जोरदार टक्कर दिली पण काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी त्यांचा ९४३ मतांनी पराभव केला होता. भंडारा-गोंदियामध्ये भाजपाने गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत हेमंत पटले यांना उमेदवारी दिली पण ते पराभूत झाले. यावेळी स्थानिक जातीय समीकरणांचा विचार करुन भाजपातर्फे कुणबी समाजाला संधी दिली जाईल, असे म्हटले जाते.
माहिती अशी आहे की, माजी मंत्री आणि वर्धेचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर यांना यावेळी भाजपाची वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. सागर हे २०१४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते आणि मोदी लाटेत त्यांचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते. सागर यांचे बंधू समीर हे नागपूर जिल्ह्यातील हिंगणामधून भाजपाचे आमदार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी उमेदवारी मागितली आहे. गेल्यावेळीच त्यांची खासदारकीसाठी लढण्याची तीव्र इच्छा होती पण मुंडे-गडकरी वादात त्यांची संधी हुकली होती. यावेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे अन्यत्र राजकीय पुनर्वसन केले जाईल.
अहमदनगरचे विद्यमान भाजपा खासदार दिलिप गांधी यांच्या पर्यायाचा विचारही पक्षात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत गांधी यांचा मुलगा आणि सून असे दोघेही पराभूत झाले होते. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तेथे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठीच्या चढाओढीत एखादा तगडा चेहरा गळाला लागेल का, यावर भाजपाची नजर आहे. भाजपामधूनच पर्याय द्यायचा तर पालकमंत्री राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ही नावे प्रामुख्याने आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी मध्यंतरी लोकसभेला लढण्याची घोषणा करून खळबळ उडविली होती. ते भाजपाचे उमेदवार होऊ शकतात, असेही म्हटले जात होते. तथापि, तीन राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आणि एकूणच वातावरण भाजपाविरोधी असल्याचा अंदाज आल्याने सुजय यांनी भाजपात जाण्याचा विचार सोडला असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले.
सोलापूरमध्ये माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार असतील, असे नक्की मानले जाते. त्यामुळे भाजपाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी राज्यसभेचे सदस्य अमर साबळे यांचे नाव निश्चित मानले जाते. साबळे यांनी एक वर्षापासून सोलापुरात संपर्क ठेवला आहे.

माढा मतदारसंघ पक्षासाठी महत्त्वाचा

सोलापूर शेजारचा माढा मतदारसंघ युतीमध्ये गेल्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यात होता व तेथे सदाभाऊ खोत लढले पण राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी ही जागा भाजपा आपल्याकडे घेईल, असे म्हटले जाते. त्या परिस्थितीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे ही नावे चर्चेत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना आपल्याकडे आणून उमेदवारी देण्याची खेळीही भाजपा खेळू शकते.

ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पर्यायाचादेखील विचार केला जात आहे. मात्र, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी खासदारकीसाठी लढण्यास होकार दिला, तर सोमय्या यांना डच्चू दिला जाऊ शकतो. या शिवाय, नांदेडमधून उमेदवार बदलण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title:  BJP giving new faces to the Lok Sabha continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.