Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:21 PM2022-08-03T16:21:43+5:302022-08-03T16:23:00+5:30
Maharashtra Political Crisis: पुण्यात शिवसैनिक आहेतच किती, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला होता. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे गटातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर जाताना पाहायला मिळत आहे. यातच आता उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ते शिवसैनिक नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
'म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा', अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडूनच उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा गमछा घालून घोषणाबाजी करत आहेत. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे, असे सांगत पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांची खिल्ली उडवली.
पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्तेच नाहीत
ज्या पद्धतीने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झालाय ते पाहता हा हल्ला शिवसैनिकांनी केलेला नाही. कारण शिवसैनिक इतक्या मोठ्या संख्येने पुण्यात नाहीत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोकं आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं आदित्य ठाकरेंची रॅले होतेय आणि जिथं जिथं मोठ्या सभा होताहेत तिथं खासकरून पवारांची माणसं तिथे उपस्थित असतात. त्यामुळे याच लोकांनी हल्ला केला असेल, असा मोठा दावा पडळकर यांनी केला.