ओबीसी आरक्षण: “मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं”; सुप्रिया सुळेंच्या विधानाचा भाजपकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:22 PM2022-06-16T13:22:39+5:302022-06-16T13:23:37+5:30
ओबीसी, मराठा आरक्षणाचे वाट्टोळे करणाऱ्या प्रस्थापितांची खरी वृत्ती समोर आली. येणाऱ्या निवडणूका आरक्षणाविना घेणार, हा हेतू स्पष्ट झाला, असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे.
मुंबई: आताच्या घडीला विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीसह ओबीसी आरक्षणावरूनही राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. मध्य प्रदेशने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले ओबीसी आरक्षण मान्य झाल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कशी भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपसह अन्य विरोधकांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीकास्त्र सोडले आहे. यातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या एका विधानाचा निषेध केला असून, यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली, अशी घणाघाती टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे यांना ओबीसी आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावेळी मध्य प्रदेशचा दाखला देण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावर बोलताना, मध्य प्रदेश सरकारचे ओबीसी आरक्षण मान्य करण्यात आले असले, तरी त्यामुळे ६० टक्के सीट कमी झाल्या आहेत. एखादा मुलगा नापास झाला तर त्याचा आदर्श सांगितला जात नाही. मेरिटमध्ये आलेल्या मुलाचे उदाहरण दिले जाते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
देव पावला, आपण पुढे गेलो नाही
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मध्य प्रदेशमध्ये जागा कमी झाल्या असून, त्याचे उदाहरण देणे योग्य नाही, ते चुकीचे आहे. राज्यात यासाठी छगन भुजबळ दिवसरात्र यासाठी काम करत आहेत. मध्य प्रदेशप्रमाणे आपण करायला गेलो असतो, तर आपल्याकडील ६० टक्के जागा कमी झाल्या असत्या. देव पावला, आपण पुढे गेलो नाही. आपले नुकसान झाले असते. त्यामुळे एकार्थी मला आनंद आहे की हे या पद्धतीने झाले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावर गोपीचंद पडळकर यांनी जाहीर निषेध नोंदवत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली
ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची ही खरी वृत्ती समोर आली. “एकाअर्थी मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं” या विधानावरुन येणाऱ्या निवडणूका ओबीसी राजकीय आरक्षणाविनाच हे घेणार आहेत, हा त्यांचा हेतू स्पष्ट झाला. मी जाहीर निषेध करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.