Maharashtra Politics: “...म्हणूनच शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, पण त्याने काही फरक पडणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:06 PM2022-09-29T20:06:29+5:302022-09-29T20:10:34+5:30
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलेही काम राहिलेले नसून, त्यांना राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या एका विधानावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पलटवार केला असून, शरद पवारांनी कितीही दौरे केले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असा टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवारांचा दाखला देत सत्तेत येण्याचं विधान केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभेत नुकतेच सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील लोकांच्या प्रेमाबद्दल आपले मत व्यक्त केले. निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही
राज्यात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. राष्ट्रवादीला आता दौरे करत बसावे लागते. शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असे म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलेही काम राहिलेले नाही. त्यामुळे काहीतरी वाद उफाळण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. त्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"