Maharashtra Political Crisis: “शिवसेना खोलात गेलीय, कोणताही टेकू लावा, पक्ष वर येणार नाही”; भाजपचा ठाकरेंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 04:14 PM2022-08-30T16:14:04+5:302022-08-30T16:15:11+5:30
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाला विरोध करुन समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मेसेज देणार? अशी विचारणा भाजपने केली आहे.
Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यापही शमलेले दिसत नाही. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली असून, आता कोणताही टेकू लावा, शिवसेना वर येणार नाही, असा मोठा दावा केला आहे.
संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असे संभाजी ब्रिगेडने युती करताना म्हटले होते.
उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार?
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली. आता त्यांना पुन्हा ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे, असा टोला लगावत ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला. ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? अशी रोखठोक विचारणाही पडळकर यांनी यावेळी बोलताना केली. तसेच ज्यांना लोकात कोणतीही किंमत नाही, जनाधार नाही, अशा लोकांसोबत ते युती करत आहेत. शिवसेना किती खोलात गेली आहे, हे यावरूनच समोर आले आहे. पण अशा कोणत्याही टेकूने आता शिवसेना वरती येणार नाही, असे सांगत गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवर शेरेबाजी केली.
दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. या लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत करतो. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता.