भाजपाला अतिआत्मविश्वास नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:56 AM2018-06-01T05:56:42+5:302018-06-01T05:56:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता.

BJP got very confident | भाजपाला अतिआत्मविश्वास नडला

भाजपाला अतिआत्मविश्वास नडला

googlenewsNext

नंदू परसावार / अंकुश गुंडावार
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपाविरुद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाने बांधला होता. परंतु, राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी खा. नाना पटोले यांनी पायाला भिंगरी बांधल्यागत दोन्ही जिल्हे पिंजून काढले. आणि मधुकर कुकडे यांच्या रूपाने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला विजय मिळवून दिला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपाच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या जागेवर दावा केला होता. अखेर प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणली. त्याचवेळी या उमेदवारीवर दावा करणारे नाना पटोले यांनी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगून पहिल्या दिवसापासून मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी सरसावले होते. अशातच राष्ट्रवादीचा पराभव नव्हे, तर पटोलेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजपाने सहाही विधानसभेत १८० विस्तारक नेमले होते. याशिवाय राज्यातील मंत्र्यांच्या प्रचारसभा घेतल्या. परंतु वाढती महागाई, शेतकºयांचा आक्रोश, मोदींनी दिलेल्या आश्वासनांची न झालेली पूर्तता आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर शिवाय अखेरच्या टप्प्यात ईव्हीएमचा झालेला घोळ याच मुद्द्यांमुळे मतदारांनी भाजपाला सपशेल नाकारले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पाच आमदार आहेत. यात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हेही याच मतदारसंघातील असून त्यांच्या सोबतीला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडाराचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही गोंदिया विधानसभा क्षेत्र वगळता तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनीमोरगाव आणि तिरोडा या पाचही विधानसभा क्षेत्रांत भाजपा मतांच्या आघाडीत माघारला आहे.

Web Title: BJP got very confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.