भाजप सरकारने केले के. डी. शिंदेंना आमदार!
By admin | Published: August 7, 2015 10:28 PM2015-08-07T22:28:44+5:302015-08-07T22:28:44+5:30
केंद्राचे पत्र : गॅसचे अनुदान परत करा
सांगली : जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघनिष्ठ कार्यकर्त्यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचे वेध लागले असताना, केंद्रातील भाजप सरकारने जनता दलाचे जिल्हाध्यक्ष के. डी. शिंदे यांनाच विधानपरिषदेचे आमदार केले आहे! आमदार म्हणून त्यांना केंद्राने पत्र पाठवून घरगुती गॅस सिलेंडरचे अनुदान परत करण्याची विनंती केली आहे. या पत्राने शिंदे कुटुंबियांनाही गुरुवारी अचानक धक्का बसला. डाव्या चळवळीतील खंदे कार्यकर्ते व जनता दलाचे नेते म्हणून के. डी. शिंदे सुपरिचित आहेत. विविध चळवळीत त्यांचा सहभाग असतो. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी जनता दलाचे उमेदवार म्हणून रिंंगणात उडी घेतली होती. पण त्यांना आमदार होता आले नाही. आजअखेर जनता दलानेही त्यांना कधी आमदारकीची संधी दिली नाही. पण त्यांना ही संधी अखेर केंद्रातील भाजपने दिली! त्याचे असे झाले, केंद्र शासनाने अनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान परत करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर मोहीम उघडली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आमदार, खासदारांना पत्र पाठवून अनुदान परत करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार एक पत्र के. डी. शिंदे यांनाही गुरुवारी प्राप्त झाले. या पत्रात के. डी. शिंदे यांचा उल्लेख लोकनियुक्त प्रतिनिधी असा करण्यात आला असून, आपण विधानपरिषदेचे आमदार आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गॅसचे अनुदान परत करावे, अशी विनंती केली आहे.
हे पत्र हाती मिळताच शिंदे यांना काहीच सुचले नाही. पत्राच्या लखोट्यावरही पत्ता लिहिताना त्यांचा उल्लेख विधानपरिषदेचे आमदार असा करण्यात आला आहे. या पत्राने शिंदे कुटुंबीय अचं'िबत झाले. जनता दलाने शिंदेंना कधी आमदार केले नाही, पण भाजपने केले, अशी प्रतिक्रिया त्यांचे पुत्र अॅड. अमित शिंदे यांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)