"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 09:21 AM2024-11-17T09:21:50+5:302024-11-17T09:23:52+5:30
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी ७२ हजार कोटी गुंतवणुकीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. महामार्गांचे जाळे विस्तारण्यात येत आहे, वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे दुष्काळातून कायमची मुक्ती होणार, असे दानवे यांनी मुलाखतीत सांगितले.
मराठा समाजाचा आरक्षण लढा १९८० मध्ये सुरू झाला. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर मी माझे जीवन संपवून टाकेन, असा अल्टिमेटम अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन सरकारला दिला होता. तेव्हाच्या सरकारने आरक्षण दिले नाही म्हणून त्यांनी जीवन संपविले. मात्र, आमच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण मिळाले. परंतु पुढे उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात ते टिकविता आले नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा महायुतीला फटका बसला. यावेळी काय होईल?
उत्तर : विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. यावेळी तसे होणार नाही. मराठा समाजाला भाजप-महायुतीच आरक्षण देऊ शकते, हा लोकांचा विश्वास आहे. आम्हीही त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या ४२ आंदोलनकर्त्यांपैकी पात्र ३५ वारसांना एसटीत नोकरी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन केले. आठ हजार कोटींचे कर्ज वितरित केल्यामुळे या समाजातील १ लाखांहून अधिक उद्योजक बनले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली, त्यात साडेसतरा लाख विद्यार्थ्यांना ९,२६२ कोटी रुपये मिळाले. अधिछात्रवृत्ती योजनेमुळे ५१ उमेदवार यूपीएससीत, तर ४८० जण एमपीएससीत यशस्वी झाले. एवढेच नव्हे, तर सारथीमार्फत ८० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. विरोधकांनी या समाजासाठी काय केले ते सांगावे?
प्रश्न : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्या सरकारने आणि आताच्या महायुती सरकारने मराठा समाजासाठी काय केले?
उत्तर : सारथीच्या विविध विभागीय कार्यालयांना १,०२४ कोटी रुपये देण्यात आले. समाजाच्या २७ हजारांवर विद्यार्थ्यांना काैशल्य विकास प्रशिक्षण सुरू झाले. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गेल्यावर्षी ३२,५३९ विद्यार्थ्यांना ३२ कोटी रुपये, तर यंदा ४० हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रुपये दिले. महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या ५० हजार प्रती प्रकाशित केल्या. वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू केली.
प्रश्न : मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी आपल्या सरकारने काय केले?
उत्तर : सर्वांत महत्त्वाची योजना म्हणजे मराठवाडा वाॅटर ग्रीड. महाविकास आघाडीने बासनात गुंडाळलेल्या या योजनेला आता केंद्राची मंजुरी मिळाली आहे. पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यात येणार आहे. दमणगंगा-वैतरणा-गोदावरी खोऱ्यातील या १३,४९७ कोटींच्या नदीजोड प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे ४.६८ टीएमसी पाणी गोदावरीत वळवून मराठवाड्यात आणण्यात येत आहे.
प्रश्न : मराठवाड्यात पायाभूत सुविधांचा अभाव कसा दूर होईल?
उत्तर : मराठवाड्याचे मागासलेपण कायमचे दूर करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. सुमारे ७२ हजार कोटी गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत. यातून चाळीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. जालना येथे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क उभारला आहे.
प्रश्न : आपण रेल्वे राज्यमंत्री म्हणून मराठवाड्याला काय दिले?
उत्तर : लातूरमध्ये रेल्वे कोच फॅक्टरी सुरू झाली आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आम्ही मार्गी लावला. जालना-जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होत आहे. अमृत स्थानक योजनेंतर्गत मराठवाड्यातील १४ स्थानकांचा विकास केला जात आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गासाठी ४५२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याच प्रमाणे मनमाड ते नांदेड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले व राज्यातील सहावी वंदे भारत रेल्वे सेवाही जालना ते छत्रपती संभाजीनगर-मुंबईसाठी सुरू केली आहे. त्याच प्रमाणे जालना व छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे पिटलाइन मंजूर केली असून, यामुळे २ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
प्रश्न : मराठवाड्यातील रस्त्यांचे काय?
उत्तर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी नुकताचा २८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी मिळाली आहे. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाला मंजुरी मिळाली आहे.
प्रश्न : मराठवाड्यात पर्यटन विकासाला खूप वाव आहे, त्याचे काय?
उत्तर : मराठवाड्यातील जवळपास सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. शिवाय, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास केला जात आहे. अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध स्थळी पर्यटकांसाठी सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.
अब्दुल सत्तारांनी भाषा बदलावी
अब्दुल सत्तार म्हणातात, माझ्यात सरकार आणि मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. यावर मत विचारले असता, दानवे म्हणाले, राजकारणात प्रत्येकाने संयमी भाषा ठेवली पाहिजे. असा दंभ चांगला नाही. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु त्यांना खरेच तसे वाटत असेल तर आपण काय करणार?