‘भाजपा सरकार असंवेदनशील’
By Admin | Published: November 1, 2015 01:49 AM2015-11-01T01:49:55+5:302015-11-01T01:49:55+5:30
महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी
उस्मानाबाद : महाराष्ट्रात चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा, तर छत्तीसगडमध्येही घोटाळे समोर येत आहेत़ महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ त्यावर मात करून शेतकरी आत्महत्या रोखण्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपा आणि शिवसेनेचे खुर्चीसाठी भांडण सुरू आहे़ त्यामुळे अशा असंवेदनशील शासनाविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी दिली़
उस्मानाबाद येथे शनिवारी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे महिला दुष्काळ परिषद व महिला मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ ओझा म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे़ मात्र, राज्यातील भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी खुर्चीसाठी भांडण करीत आहेत़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, भाजपा २,८०० तर शिवसेना ४,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत आहे़ त्यावरून शेतकऱ्यांच्या प्राणांची किंमतही शासनाला कळू शकलेली नसून, शेतकरी आत्महत्या रोखण्यातही शासनाला अपयश आले,’ असे त्यांनी सांगितले़
काँग्रेसच्या सत्तेत तुरडाळ ५५ रुपये किलो झाली, म्हणून विरोधी बाकावर असताना भाजपाने आंदोलन पुकारले होते़ तूरडाळ आता २०० रुपये किलोच्या पुढे गेली आहे़ युवकांच्या हाताला काम नाही, गुन्हेगारी वाढली असून, महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे़ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, शैक्षणिक, परीक्षा शुल्क माफी देणे आवश्यक असताना सांप्रदायिक अजेंड्यावर काम सुरू आहे, अशी टीका ओझा यांनी केली. (प्रतिनिधी)