भाजपा सरकारला सत्तेची घमेंड, त्यांनी जनतेची फसवणूक केली : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:46 AM2017-10-09T02:46:26+5:302017-10-09T02:47:56+5:30
केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे
पारनेर (अहमदनगर) : केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्धी येथील शिबिरात केला.
लोकपाल, शेतकरी आंदोलन व निवडणूक सुधारणा आदी मुद्यांवर जानेवारीत दिल्लीत देशव्यापी जनआंदोलन छेडणार आहोत, असे अण्णांनी जनआंदोलनाच्या तयारीसाठी देशातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात सांगितले. रविवारी समारोपप्रसंगी अण्णा म्हणाले, ग्रामसभा ही विधानसभा व लोकसभेची जननी असल्याने तिला अधिकार मिळाले पाहिजेत. ‘नोटा’ अधिकाराची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक व्हावी. लोकांनी नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा तिकीट दिले जाऊ नये. शेतकºयांच्या प्रश्नांवर सखोल विचार व्हावा. पीक कर्जावर कायद्याचे उल्लंघन करून मनमानी व्याज आकारले जाते. पिकविम्याच्या माध्यमातून शेतकºयांची लूट होते. बँक रेग्युलेशन कायद्याचे बँकांकडून पालन होत नाही. त्यामुळे शेतकºयांना आत्महत्या करण्याची वेळ येते.
न्यासाचे प्रा. बालाजी कोंपलवार, अशोक सब्बन, अल्लाउद्दीन शेख, अजित देशमुख आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सरपंच रोहिणी गाजरे यांनी आभार मानले.