कॉँग्रेसविषयी भाजपा सरकारची ‘सद्भावना’;राष्टवादीला नामोहरम केली जात असल्याची जयंत पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 10:37 PM2017-09-24T22:37:29+5:302017-09-24T22:39:42+5:30
राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
नाशिक : राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्या मित्र पक्षाविषयी मात्र समन्वय आणि मित्रत्वाची भूमिका असल्याचे सांगत कॉँग्रेसचा नामोल्लेख न करता त्यांनी राज्य सरकारकडून त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेतली जात असल्याची टीका केली आहे.
नाशिकच्या जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर जयंत पाटील यांनी रविवारी (दि.२४) ग्रामीण आणि शहर राष्टवादी कॉँग्रेसच्या बैठका राष्ट्रवादी भवनात घेतल्या. यावेळी त्यांनी ही टीका करतानाच येत्या १ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचे संकेत दिले. आमदार हेमंत टकले, पंकज भुजबळ, माजी खासदार माधवराव पाटील, देवीदास पिंगळे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष पंकज भुजबळ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यातील नव्या सरकारची नवलाई संपुष्टात आली असून, तीन वर्षांत विविध पातळ्यांवर अपयश आलेले हे अपयशी सरकार आहे. तीन वर्षांत राज्याची प्रगती झाली की अधोगती याचा विचार केल्यानंतर आता कोणताही सुजाण नागरिक पुन्हा कमळाला मत देणार नाही. सध्याच्या सरकारविषयी भाजपा कार्यकर्त्यांशिवाय कोणीही उत्साहाने बोलत नाही, असे सांगून जयंत पाटील म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे वातावरण भाजपा करीत आहेत. मात्र विरोधी पक्ष म्हणून राष्टवादी कॉँग्रेसच प्रभावी ठरू शकत असल्याने जाणीवपूर्वक समज- गैरसमज निर्माण करणाºया चर्चा पसरवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे राष्टÑवादीला नामोहरम करण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. असे सांगून त्यांनी आपल्या मित्राविषयी मात्र सद्भावना आणि मित्रत्वाची भूमिका सरकारची दिसते आहे, असे ते म्हणाले.
सार्वत्रिक निवडणुकांना आता अवघे दीड ते दोन वर्षे शिल्लक असल्याने आता कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असे सांगून त्यांनी १ आॅक्टोबर रोजी राज्यात भाजपा सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, तसे प्रदेश स्तरावरून घोषित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले