वनजमीन हडपण्याचा भाजपाचा डाव
By Admin | Published: January 22, 2016 03:38 AM2016-01-22T03:38:34+5:302016-01-22T03:38:34+5:30
पतंजलीला वनौषधी देण्याच्या बहाण्याचे रामदेवबाबांच्या माध्यमातून वनजमीन हडपण्याचा डाव भाजपाने रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
मुंबई : पतंजलीला वनौषधी देण्याच्या बहाण्याचे रामदेवबाबांच्या माध्यमातून वनजमीन हडपण्याचा डाव भाजपाने रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच रामदेव बाबांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील २० टक्के (६० हजार वर्ग किलोमीटर) वनजमीन आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी पंतजली समूहाला देण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे. वास्तविक, वनजमीन खाजगी व्यक्ती, संस्थेला देता येत नाही. तशी कुठल्याही कायद्यात तरतूद नाही. परंतु त्यासाठी वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही जमीन देण्याचा घाट घातला जात असून, वनमंत्री मुनगंटीवार हे तर ‘जंगल बुक’मधील मोगलीसारखे वागत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.
आयुर्वेद क्षेत्रात डाबर, हमदर्द, बैद्यनाथ, झंडू, हिमालया, चरक, विको, इमामी यांसारख्या नामांकित संस्था वर्षानुवर्षे काम करत असताना २००६ साली स्थापन झालेल्या पतंजली उद्योगसमूहाला वनौषधी देण्याचा निर्णय का, असा सवाल करत जर आयुर्वेदला प्रोत्साहन द्यायचे असेल तर या क्षेत्रात शंभरहून अधिक वर्षे कार्यरत असणाऱ्या कंपन्याचादेखील विचार झाला पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली.