भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:31 PM2024-02-14T14:31:00+5:302024-02-14T14:31:38+5:30

भाजपाने महाराष्ट्रातून सध्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली असून चौथ्या नावावर सस्पेन्स कायम आहे

BJP has announced the nomination of names from Maharashtra for the Rajya Sabha | भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

BJP Rajya Sabha Maharashtra: फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडूनमहाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपा आणि महायुतीतील शिंदे गट असे मिळून एक ४ उमेदवारांची नावे जाहीर झाली. भाजपाने आपल्या पक्षाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेचे तिकीट दिले. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील सध्याच्या समीकरणांनुसार राज्यसभेच्या एकूण ६ जागांपैकी ३ जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भूषवणारे अशोक चव्हाण यांनी परवा अचानक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळीच चर्चांना उधाण आले होते. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या यादीत भाजपाकडून स्थान मिळाले.

त्यांच्यासोबतच पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही यात स्थान मिळाले. भाजपाचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून आमदारकीची उमेदवारी देताना, मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर, मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

त्यासोबत नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली. नांदेडचे डॉ. अजित गोपछडे हे शहरातील डॉक्टर असून, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यातून रा. स्व. संघाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. तसेच, मागच्या भाजपच्या सत्ताकाळात त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. ते लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने भाजपाने नांदेडसह लातूर, धाराशिव येथील लिंगायत समाजाच्या मतदारांना आकर्षित करत 'सोशल इंजिनिअरिंग' साधले असल्याची चर्चा आहे.

डॉ. अजित गोपछडे

Web Title: BJP has announced the nomination of names from Maharashtra for the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.