भाजपालाही द्यावे लागेल रस्ते घोटाळ्याचे उत्तर
By admin | Published: January 31, 2017 03:36 PM2017-01-31T15:36:08+5:302017-01-31T15:36:08+5:30
नरेंद्र मोदी लाटेत मुंबईत पंधरा आमदार निवडून आणल्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या भाजपाच्या आकांक्षेला धुमारे फुटले
गौरीशंकर घाळे
मुंबई : नरेंद्र मोदी लाटेत मुंबईत पंधरा आमदार निवडून आणल्यानंतर महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या भाजपाच्या आकांक्षेला धुमारे फुटले. स्वबळाचे वेध लागलेल्या भाजपाने वर्षभरापासूनच मित्रपक्ष शिवसेनेला लक्ष्य करत महापालिकेतील घोटाळे चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली. पालिकेतील गैरव्यवहारांपासून पिच्छा सोडविण्यासाठी केलेली ही खेळी आता भाजपावरच उलटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याशी युतीची चर्चा कशी करता, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्याच्या मुद्दयावर भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर वारंवार निशाणा साधला. विशेषत: रस्ते घोटाळ्यावरुन महापालिकेची मोठी नाचक्की झाली. दुरुस्ती आणि रस्त्यांसाठी एकूण ३ हजार ४०० कोटींचे बजेट असतानाही मुंबईकर मात्र खड्डयांनी हैराण आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेला भाजपाने अप्रत्यक्षपणे शिवसेनालाच जबाबदार ठरविले. मात्र आता दोन्ही पक्षांत युतीची बोलणी सुरुझाल्याने घोटाळ्यांवरुन भाजपाने घेतलेल्या भूमिकेवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. महापालिकेतील घोटाळ्याला भाजपाही तितकीच जबाबदार असल्याची आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. तर, ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याशीच युतीची चर्चा करणा-या भाजपाला नेमका कोणता पारदर्शक कारभार हवा, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
इतके दिवस भाजपाच्या आरोपांवर सावध भूमिका घेणारी शिवसेनाही आता बोलू लागली आहे. महापालिकेतच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत, आशिष शेलार महापालिकेत भाजपाचे गटनेते होते, तेव्हा त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप का केले नाहीत, असा सवाल शिवसेनेचे मुंबईतील आमदार आणि रणनितीकार अनिल परब यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे एकूणच महापालिकेतील गैरकारभारापासून सुटका करुन घेण्याचा भाजपाचा प्रयत्न अंगलट आल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या जोडीला भाजपाला रस्ते घोटाळ्याबाबत विरोधकांच्या मा-याला सामोरे जावे लागणार आहे.