भाजपाने स्वपक्षाची ' काँग्रेस' केली आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 08:33 AM2017-02-27T08:33:01+5:302017-02-27T08:33:01+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून भाजपाने स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

BJP has done 'Congress' for Swapaksha - Uddhav Thackeray | भाजपाने स्वपक्षाची ' काँग्रेस' केली आहे - उद्धव ठाकरे

भाजपाने स्वपक्षाची ' काँग्रेस' केली आहे - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - 'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. ' मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ' काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसेच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
 
> राजकारणात कधी काय घडेल याचा भरवसा उरलेला नाही. इकडच्या बोटावरची थुंकी तिकडच्या बोटावर करण्याचे प्रकार तर जादूगार मंडळींनाही लाजवतील. सध्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्या पक्षास अचानक जी सूज आली आहे ती तात्पुरतीच आहे, पण जणू काही सत्तेचा अमरपट्टा आपल्याच कमरेस बांधल्याच्या थाटात घोषणा आणि वल्गना चालल्या आहेत. आम्ही त्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकू इच्छित नाही. मुंबईच्या महापौरपदावरून ‘भाजप’ नेते रिकाम्या भांडय़ांची आदळआपट करताना दिसत आहेत. हा त्यांचा स्वभावधर्म असेलही, पण आता निवडणुका संपल्या आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. शिवसेनेस मुंबईत काही जागा कमी मिळाल्या. पण सलग पाचव्यांदा मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला, याचा काय अर्थ घ्यायचा? भाजपचाही आकडा मोठा लागला, पण शेवटी सट्टेबाज व शेअर बाजारातील बंद मुठीवाल्यांनी मतांबरोबर पैशांची उधळण केल्यावर राजकारणात विजयाचे नगारे वाजणारच. तसे ते वाजले आहेत म्हणून सत्तेचा वापर करून नव्याने हातचलाखीचे प्रयोग करणे धक्कादायक आहे. ‘‘भाजपने निवडणुकीत पैशांचा महापूर केला. मी खोटे बोलत असेन तर भाजपने माझ्यावर गुन्हा दाखल करावा’’ असे आव्हान ‘भारिप’ नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. हे परखड सत्य आहेच. 
 
> दुसरे सत्य असे की मोदींची नोटाबंदी गरीबांसाठीच होती, पण नोटाबंदी असताना ज्यांनी धो धो पैशांचा पाऊस पाडला त्यांनी आता इतरांना नीतिमत्तेचे दाखले देऊ नयेत. हा महापूर मुंबई, पुणे, उल्हासनगर, ठाण्यासह सर्वत्र दिसला तरी शिवसेनेने मुंबई-ठाण्यात तो रोखलाच आहे. तरीही ज्यांनी या महापुरात गटांगळय़ा खाण्यातच स्वतःस धन्य मानले त्यांना लवकरच आई जगदंबा सुबुद्धी देवो. पैसा हाच पंचप्राण मानणारे विजयासाठी व सत्ता टिकविण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘तोंडपादऱ्यां’नी सध्या नवी फुसकुली सोडून स्वतःच्याच नाकातील केस जाळून घेतले आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना काँग्रेसच्या मदतीने महापौरपद मिळविणार असल्याची कुजबुज या तोंडपादऱयांनी सुरू केली व त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘‘भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, जायचे असेल त्यांनी जावे.’’ निवडणुका संपल्या तरी मुख्यमंत्री आजही प्रचाराच्या व्यासपीठावरच आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विधानांचे आणि भूमिकेचे स्वागतच करतो, पण त्यात थोडा बदल करू इच्छितो. मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, ‘‘आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार!’’ 
 
> काँग्रेस नक्कीच संशयास्पद आहे, पण अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुले समर्थन करणाऱया मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘सत्ता’ उबवणे हे जास्त घातक आहे. अर्थात हा ‘घातकी’ प्रकार राष्ट्रासाठी केल्याची टिमकी वाजवायला हे मोकळेच आहेत! अफझल गुरूस काँग्रेस राजवटीत फासावर लटकवले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूस ‘हुतात्मा’ वगैरे मानतात हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱयांना चालते काय? अफझल गुरूस शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले व आपला विजय शिवचरणी अर्पण केला. म्हणजे जे ढोंग निवडणुकीआधी हुतात्मा स्मारकावर जाऊन केले तेच ढोंग रायगडावर झाले. शिवरायांचा महाराष्ट्र अखंड आणि अभंग राहणार की नाही हे आधी बोला. त्यावर एकही तोंडपादरा बोलायला तयार नाही. काँग्रेससोबत जायचे की नाही हा वाद निरर्थक असून अफझल गुरूच्या ‘गॉडमदर’ मेहबुबा मुफ्तीशी संबंध ठेवायचे की नाही हाच खरा देशासमोरील सवाल आहे. 
 
> जवानांच्या चकमकीत मारलेल्या अश्रफ वानीच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत मेहबुबा मुफ्ती देत आहेत व त्या सरकारी आदेशांवर ‘भाजप’ सरकारने अंगठा उमटवून जवानांच्या हौतात्म्याचा अवमान केला आहे. दुसरे असे की, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. विजय मिळाला व आकडे वाढले म्हणून प्रतिष्ठा मिळेलच असे नाही. कधीकाळी असे आकडे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मिळत होते, पण प्रतिष्ठा मिळाली काय? काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत. ‘साला मैं तो साब बन गया’च्या तालावर ‘‘साला मैं तो काँग्रेसवाला बन गया’’ असे नवे गीत रचून त्यावर विजयाच्या फुगड्या घालणाऱ्यांना सलाम!
 

Web Title: BJP has done 'Congress' for Swapaksha - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.