भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत; प्रत्येक सहावं तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:10 PM2019-10-03T12:10:27+5:302019-10-03T12:12:12+5:30
भाजपकडून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या नातलगांना देण्यात आलेली उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या धोरणामुळे वर्षांनुवर्षे पक्षाच काम निष्ठेने करण्यावर अन्याय होतो हेच खरं.
मुंबई - विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपमध्येच या विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीला ऊत आला आहे. भाजपने नुकतीच 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये प्रत्येक सहावे तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला किंवा नातलगांना देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा नातलगांचीच मांदेळाई होणार असं चित्र आहे.
भाजपने जाहीर केलेल्या 125 पैकी 19 उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या नेत्यांचे किंवा नेत्यांच्या कुटुंबातील आहे. यामध्ये नेत्याचा मुलगा, सून, बायको, पुतण्या या नात्यांची रेलचेल दिसत आहे. माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना परळीतून, माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर यांना खामगावमधून तिकीट देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त ऐरोलीतून माजीमंत्री गणेश नाईक यांना तिकीट देण्यात आले असून ते संदीप नाईक यांचे वडील आहेत.तर अकोले मतदार संघातून माजीमंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नवापूर मतदार संघातून माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित, भोकरदनमधून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे, वाईमधून माजीमंत्री प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. मुला-मुली व्यतिरिक्त भाजपने पुणे कॅन्टोनमेंट मतदार संघातून भाजपने माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना तर कोपरगावमधून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच माजी आमदार आणि माजी खासदारांच्या नातलगांवर देखील भाजपने विश्वास दाखवला आहे. माजी आमदार विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा, माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे, माजी आमदार मुन्ना महाडीक यांचे बंधू अमल महाडीक, नाशिक मध्यमधून एन.सी. फरांदे यांच्या सूनबाई देवयानी फरांदे, तर कराड मधून माजी आमदार दिलीपराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना मैदानात उतरविले आहे.
या व्यतिरिक्त माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांना हिंगना मतदार संघातून, तुळजापूर मतदार संघातून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीतसिंह पाटील, शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे, निलंगा मतदार संघातून माजी खासदार रुपाली निलंगेकर यांचे पुत्र संभाजी निलंगेकर आणि पनवेलमधून माजी खासदार रामसेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एकूणच भाजपकडून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या नातलगांना देण्यात आलेली उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या धोरणामुळे वर्षांनुवर्षे पक्षाच काम निष्ठेने करण्यावर अन्याय होतो हेच खरं.