भाजपाने गुंडांना पावन करून घेतले - विखे
By admin | Published: February 17, 2017 01:04 AM2017-02-17T01:04:54+5:302017-02-17T01:04:54+5:30
गुंडांना पक्षात घेऊन नाशिकची शांत शहर असलेली ओळख पुसण्याचा भाजपाने प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील
नाशिक : गुंडांना पक्षात घेऊन नाशिकची शांत शहर असलेली ओळख पुसण्याचा भाजपाने प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला आहे. शिवसेना व भाजपाचे भांडण हा तमाशा असून, जनतेची निराशा करणाऱ्या सरकारला घालविण्यासाठी कॉँग्रेस पक्षच मदत करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिक महापालिकेच्या कॉँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. सरकार स्थापन करून अडीच वर्षे झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शक कारभाराच्या गमजा मारत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या नाशिक येथील दोन व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या असून, एकात एबी फॉर्मसाठी भाजपा पक्ष कार्यालयातच दोन लाखांची मागणी तर भाजपा कामगार आघाडीच्या नेत्याला तिकिटासाठी दहा लाख रुपये मोजावे लागण्याची दुसरी क्लिप हाच काय भाजपाचा पारदर्शक कारभार, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्यांचे पुण्याचे नगरसेवक पारदर्शकतेची शपथ घ्यायला ज्या बसमधून गेले, त्या बसचे ५० रुपयांचे भाडेही त्यांना भरणे जिवावर आले आणि ते पारदर्शक कारभाराच्या शपथा घेणे म्हणजे विनोद असल्याचा टोला विखे-पाटील यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचे सांगतात. मात्र, राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे न देता उद्धव ठाकरे यांच्याकडे देतात. म्हणजेच यांना राजीनामे द्यायचे नाही. भाजपा- शिवसेनेचे भांडण म्हणजे तमाशा आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी असेच राजीनामे देण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात निवडणुकीनंतर ते एकत्र आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.