उल्हासनगरमध्ये सर्वाधिक मते भाजपाच्या वाट्याला
By Admin | Published: February 25, 2017 03:05 AM2017-02-25T03:05:48+5:302017-02-25T03:05:48+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारा पक्ष हा भाजपा असून त्या पक्षाने शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाने या निवडणुकीत ३३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे.
पंकज पाटील, उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारा पक्ष हा भाजपा असून त्या पक्षाने शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाने या निवडणुकीत ३३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपा आणि त्यांच्या पुरस्कृत उमेदवारांना मिळून एकूण २ लाख ८८ हजार मते मिळाली तर शिवसेनेला १ लाख ९० हजार मते मिळाली आहेत. तसेच ठराविक प्रभागांसाठी मर्यादीत न राहता साई पक्षानेदेखील मोठी भरारी घेतली असून या पक्षाला तिसऱ्या क्रमांकांची १ लाख २ हजार मते मिळाली. या निवडणुकीत ३६ हजार १८३ मते ही केवळ ‘नोटा’ ला मिळाली आहेत. ‘नोटा’च्या मतांचा आकडा काही प्रभागात एवढा मोठा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि एका प्रभागात तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत.
उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपा अशीच थेट लढत होणार अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, काही वॉर्डांत साई पक्षाने भाजपा व शिवसेनेला आव्हान निर्माण केल्याचे दिसत आहे. दलित मतांचा प्रभाव हा विशिष्ट भागापुरता मर्यादीत दिसत होता. उल्हासनगर कॅम्प चार आणि पाचमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसत असले तरी भाजपा त्यांच्या खालोखाल आहे. मात्र, हा भाग वगळता शहरात बहुसंख्य ठिकाणी भाजपाचेच वर्चस्व दिसत आहे. मतदारांनी भाजपाला भरभरुन मते दिल्याचे या निवडणुकीत दिसत आहे. साई पक्षाने चार
ते पाच प्रभागात टक्कर देत आपले ११ नगरसेवक निवडूून आणले आहेत.