भाजपवाल्यांना राममंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:35 AM2020-08-01T05:35:16+5:302020-08-01T05:35:42+5:30
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. निवडणुकीला वेळ आहे. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र राहू असे ते म्हणाले.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपवाल्यांना राममंदिरावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अयोध्येत जे घडले त्यावेळी हे बेपत्ता होते. आज कोरोनाची संचारबंदी आहे तसे त्यावेळी शांत होते. एकट्या शिवसेनाप्रमुखांनीच गर्जना केली होती, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शुक्रवारी टीका केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपल्याला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनासाठी बोलावतील अशी अपेक्षा होती का या प्रश्नात ते म्हणाले की भूमिपूजन होईल याचीच मला कल्पना नव्हती. आता त्यांनी मुहूर्त काढला आहे तर मंदिराची उभारणी लवकर करावी. मी मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेलो आणि आणखीही जाईन.
भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रातील मंदिरे राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी (५ आॅगस्ट) उघडी ठेवावीत अशी मागणी केली आहे याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, कोणाची काहीही मागणी असेल पण जनतेच्या काळजीचा विचार करून योग्य तेच मी ठरवीन. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे अशी मागणी पूर्ण करता येणार नाही. तसेही त्यांना राममंदिरावर बोलण्याचा काही अधिकार नाही. अयोध्येतील घटनेच्या वेळी ते तोंडाला मास्क न लावता गप्प बसले होते. आपण मातोश्रीच्या बाहेर का पडत नाही, असे विचारले असता ते म्हणाले, मातोश्री मी कधीही सोडणार नाही.तंत्रज्ञानाचा वापर करून मी राज्यभर संपर्कात आहे, निर्णयांची अंमलबजावणी करतोय. काम न करता फिरणं यापेक्षा न फिरता काम करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस नीट तपास करीत नसल्याची टीका आता बिहारमधील नेते करू लागले आहेत, भाजपचे नेतेही आरोप करीत आहेत यावर मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात आमचे पोलीस कोरोनाचे बळी ठरत असताना त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करणाऱ्यांची मी निंदा करतो. तपास योग्य दिशेने सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. निवडणुकीला वेळ आहे. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र राहू असे ते म्हणाले.