भाजपाने ठेवले प्रस्थापितांना दूर
By admin | Published: December 6, 2014 02:23 AM2014-12-06T02:23:01+5:302014-12-06T02:23:01+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तरुणांना अधिक संधी देताना भाजपाने प्रस्थापितांना दूर ठेवण्यात आल्याचे दिसते
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तरुणांना अधिक संधी देताना भाजपाने प्रस्थापितांना दूर ठेवण्यात आल्याचे दिसते. विविध जातींना सामावून घेण्याचा प्रयत्नही पक्षाने केला आहे. प्रादेशिक विचार केला तर विस्तारात एकच कॅबिनेट मंत्रिपद देऊन मराठवाड्याची बोळवण केली.
मराठवाड्यातून पंकजा मुंडे या आधीच मंत्रिमंडळात आहेत. आता बबनराव लोणीकर यांना संधी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री विदर्भातील आणि मागासलेल्या मराठवाड्यातून केवळ दोनच मंत्री घेण्यात आले आहेत. हरीभाऊ बागडे यांच्या रूपाने विधानसभेचे अध्यक्षपद मिळालेले आहे, तेवढाच काय तो दिलासा. शिवसेनेने तर मराठवाड्यातून कोणालाही मंत्री केलेले नाही.
राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, हरीभाऊ जावळे, भाऊसाहेब फुंडकर, चैनसुख संचेती, सुभाष देशमुख, प्रकाश भारसाकळे या दिग्गजांना बाहेर ठेवत मंत्रिमंडळाचा चेहरा तरुण ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. संपूर्ण मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर या दोनच महिला मंत्री आहेत. शिवसेनेने एकाही महिलेला संधी दिली नाही. (विशेष प्रतिनिधी)