भाजपामध्ये धुसफूस सुरूच
By admin | Published: June 2, 2016 02:36 AM2016-06-02T02:36:22+5:302016-06-02T02:36:22+5:30
विधान परिषदेसाठी मुंबईतून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि आर.एन.सिंह यांना उमेदवारी देऊ केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून आहे
मुंबई : विधान परिषदेसाठी मुंबईतून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि आर.एन.सिंह यांना उमेदवारी देऊ केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असून आहे. बुधवारी मुंबईतील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेत आपला संताप व्यक्त केला. यावर, तिकीट देण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. हा सामूहिक निर्णय आहे. तरीही कार्यकर्त्यांची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले जाईल, असे आश्वासन दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
मुंबै बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणारे प्रवीण दरेकर यांच्यासह अलीकडेच भाजपात दाखल झालेले लाड आणि सिंह यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच दुखावले आहेत. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्त्यांची दानवे यांनी बैठक आयोजित केली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आर. यु. सिंह, अमरजित मिश्रा, संजय पांडे, विवेकानंद गुप्ता आदी उत्तर भारतीय पदाधिका-यांसह सुनिल राणे व अन्य मराठी नेतेदेखील हजर झाले. मात्र, दानवे पक्ष कार्यालयातच थांबल्याने सारा लवाजमा तिकडे रवाना झाला.
प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आर.एन.सिंह भाजपाचे साधे सदस्यदेखिल नाहीत तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. असाच प्रकार चालू राहिल्यास जे बिहार विधानसभा निवडणुकीत घडले त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महापालिका निवडणुकीत पाहायला मिळेल. तुम्हाला पक्ष खड्ड्यात घालायचा आहे का, असा सवालच कार्यकर्त्यांनी दानवेंना केला. कार्यकर्त्यांच्या प्रश्नाच्या सरबत्तीमुळे दानवे यांनी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत उमेदवारीचा निर्णय सामूहिक असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)