राज ठाकरे 'बोलघेवडा पोपट'; 'त्या' व्यंगचित्राला भाजपाचं व्यंगचित्रानेच प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:02 PM2019-01-04T12:02:27+5:302019-01-04T12:03:04+5:30
काही महिन्यांपूर्वी 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन भाजपाने 'क्रोध मोदींच्या यशाचा, एक 'सेटिंगवाली' मुलाखत', या मथळ्याखाली व्यंगचित्र काढलंय.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढलं होतं. मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेली मुलाखत ही 'फिक्स' होती, त्यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरं अशा स्वरूपाची 'मनमोकळी' मुलाखत होती, असा टोला त्यांनी हाणला होता. त्यांनीच काढलेल्या या व्यंगचित्रात थोडासा बदल करून भाजपानं राज यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन भाजपाने 'क्रोध मोदींच्या यशाचा, एक 'सेटिंगवाली' मुलाखत', या मथळ्याखाली व्यंगचित्र काढलंय. त्यात राज ठाकरे शरद पवार यांनाच, 'साहेब बोला काय विचारू' असं म्हणताहेत. त्यावर, 'पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरं तयार आहेत', असं पवार सांगत असल्याचं दाखवण्यात आलंय. व्यंगचित्राच्या एका कोपऱ्यात राज ठाकरे यांची 'बोलघेवडा पोपट' म्हणून खिल्ली उडवण्यात आली आहे. थोडक्यात, तुमची मुलाखत 'फिक्स' होती, असा पलटवार भाजपाने केला आहे. मनसेचं इंजिन खाली कोसळत असल्याचा टोमणाही भाजपाने मारलाय.
बुलेट ट्रेनमध्ये गरीब प्रवास करतील काय? असा प्रश्न नको विचारू राज! मग ते मला विचारतील लवासा गरिबांसाठी होतं काय? त्यापेक्षा आपलं ठरलेलं चालू दे!
— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) January 3, 2019
एक सेटिंगवाली मुलाखत! @Jayant_R_Patilpic.twitter.com/VzTQWZrf4l
काय होतं राज ठाकरेंचं व्यंगचित्र?
'एक मनमोकळी मुलाखत!' या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत. तसेच 'बोला काय विचारू?' असं स्वतःलाच विचारत आहेत, असं दाखवलं होतं. आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित करून मोदींचा 'मी'पणा दाखवला होता.