भाजपा, दाऊदशी माझा संबंध नाही - रियाज भाटी
By Admin | Published: October 21, 2016 03:20 PM2016-10-21T15:20:03+5:302016-10-21T15:25:09+5:30
रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना दाऊद इब्राहिम आणि भाजपाशी आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - दाऊदशी कथित संबंध असलेल्या रियाझ भाटीवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर रियाज भाटी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना दाऊद इब्राहिम आणि भाजपाशी आपले कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणालाही नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
'दाऊद इब्राहिमशी माझा काहीही संबंध नाही. मी जर दाऊदचा माणूस असतो तर मला पोलीस संरक्षण मिळाले असते का?' असा सवाल भाटी यांनी विचारला आहे. ' माझ्यावर कुठल्याही प्रकारचा खटला दाखल नाही. नवाब मलिक यांनी बेताल आरोप करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.' असे स्पष्टीकरण देत भाटी यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
भाजपाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगंत त्यांच्याशी कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मी एमसीएच्या मार्केटिंग समितीचा अध्यक्ष असल्याने माझा आशीष शेलारांशी संपर्क होतो. तसेच शरद पवार यांचीही भेट होते, असे भाटी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नबाव मलिक यांनी दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले रियाझ भाटी हे भाजपाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत असा आरोप करत अनेक गुन्हे दाखल असलेल्या रियाझ भाटीवर मोक्काअंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल उपस्थित केला होता. भाजपाने मात्र मलिक यांचा आरोप फेटाळून लावताना भाटी कोण आहे ते शरद पवारच मलिक यांना चांगल्याप्रकारे समजावू शकतात, असा टोला लगावला होता.