Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 08:58 PM2022-09-12T20:58:18+5:302022-09-12T20:59:07+5:30
Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेने शिवसेनेला शह देण्याचा चंग बांधल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरात मोठे खिंडार पडले आहे. यातच आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेला अधिकाधिक ठिकाणी शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, आता शिंदे गट आणि मनसेसोबत उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मनसे आणि भाजप थेट युती होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेशी तुटलेली युती, महाविकास आघाडी सरकारचे कोसळणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाजपच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप आणि मनसे युतीबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मागील आठवड्यातील मुंबई दौऱ्याने तर भाजप नेते चार्ज झाले आहेत. यंदा काहीही करुन मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवायचा असा चंग भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी बांधलाय. मात्र यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणुकांसाठी भाजपची जवळपास संपूर्ण तयारी
दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान आपापल्या मतदारसंघात आणि वॉर्डात भाजप नेत्यांनी-नगरसेवकांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तसेच पालिका निवडणुकीसाठी भाजपची जवळपास संपूर्ण तयारी झाल्याचे म्हटले जात आहे. भाजपने सर्व्हे करुन मतदारांचाही कौलही घेतल्याची माहिती आहे. अशावेळी मनसेशी थेटपणे युती करुन त्यांना वेगळ्या जागा सोडणे भाजपला सद्याच्या राजकीय परिस्थितीत शक्य नाही.
मनसे आणि भाजप थेट युती नाही?
मनसेशी थेटपणे युती करुन त्यांना वेगळ्या जागा सोडणे भाजपला सद्याच्या राजकीय परिस्थितीत शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनसेशी थेटपणे युती करण्याऐवजी छुप्या सहकार्याची रणनीती भाजपने आखली असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला ८५ ते ९५ जागा सोडून त्यांनी मनसेच्या वॉर्डातील ताकदीनुसार त्यांना जागा द्यायच्या, असा काहीसा प्लान भाजपचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागातून एकनाथ शिंदे गटात अनेक आमदार, खासदार नगरसेवक आले. पण मुंबईत मात्र एकनाथ शिंदे गटाची ताकद तेवढी नाही. दुसऱ्या बाजूला मनसेकडे अनेक प्रभागांत चांगले उमेदवार नसल्याने त्यांचा वापर शिवसेनेच्या मतांचे विभाजन करण्यासाठी केला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. एकूणच परिस्थिती पाहता महापालिका निवडणुकीत मनसेलाही भाजपचा पाठिंबा असून, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.