"भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’, नितेश राणेंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:09 IST2025-03-26T15:08:48+5:302025-03-26T15:09:31+5:30
Nitesh Rane News: मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे म्हणाले.

"भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ ‘त्या’ मुस्लिमांना विरोध…’’, नितेश राणेंचं विधान
एकीकडे देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावासाठी भाजपाच्या काही नेत्यांना जबाबदार धरलं जात असतानाच यंदाच्या रमजान ईदच्या निमित्तानं भाजपाने ३२ लाख मुस्लिम समाजाशी जवळीक साधण्यासाठी खास भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. त्याला ‘सौगात ए मोदी’ असं नावही देण्यात आलं आहे. भाजपानं उचललेल्या या पावलाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही काळापासून मुस्लिम समाजाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या नितेश राणे यांनीही मोठं विधान केलं आहे. भाजपा सरसकट मुस्लिमांच्या विरोधात नाही, आमचा केवळ भारताविरोधात कारवाया करणाऱ्या, भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या जिहादी मुस्लिमांना विरोध आहे, असे नितेश राणे म्हणाले.
आज विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाची बाजू घेणं म्हणजे लोकांची माथी भडकवणं हे कायद्याच्या कोणत्या चौकटीत आहे, हे मला कळत नाही. मुळात आपल्या देशामध्ये जिथे ८० टक्के हिंदू समाज राहतो. त्याचा हिंदू समाजाला सणवार साजरे करू दिले जात नसतील, त्यांच्या सणांवेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असतील, लँड जिहाद, लव्ह जिहादचं समर्थन संबंधित तक्रारदार करतात का, यांचं उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हानही नितेश राणे यांनी यावेळी विरोधात तक्रार करणाऱ्यांना दिलं.
यावेळी सरसकट मुस्लिमांना विरोध नसल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, भारतात राहून जे तिरंग्याला मानतात. आमच्यासोबत वंदे मातरम् म्हणतात. आमच्या देशात राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात. पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात. आमच्या मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांचा विरोध करतात, ते आमचे मुसलमान आहेत. त्यांच्यासाठी सौगात ए मोदी सारख्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, असं नितेश राणे म्हणाले.
मी पहिल्यादिवसापासून सांगतोय की, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविरोधात आम्ही आधीही नव्हतो आणि आजही नाही. पण आपल्या देशात राहून पाकिस्तान झिंदाबाद म्हणायचं हे कुणाला मान्य आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी विचारला.