राज पुरोहित यांना भाजपाने बजावली नोटीस
By admin | Published: June 27, 2015 05:19 PM2015-06-27T17:19:12+5:302015-06-27T17:21:20+5:30
पक्षनेतृत्वावर, त्यांच्या धोरणांवर टीका करणारे आमदार राज पुरोहित यांना भारतीय जनता पक्षाने कारणा दाखवा नोटीस बजावत तीन दिवसांत लेखी खुलास करण्यास सांगितले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका करणारे आमदार राज पुरोहित यांना भारतीय जनता पक्षाने कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष असलेल्या पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी प्रसारित झाल्यानंतर भाजपामध्ये राजकीय भूकंप झाला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजलेली असतानाच भाजपाने नोटीस बजावत पुरोहित यांना जाब विचारला आहे.
' पुरोहित यांनी केलेली विधानं पक्षाची शिस्तभंग करणारी आहेत. या स्टिंग ऑपरेशनदरम्यान सीडीत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी पुरोहित यांनी तीन दिवसांत अध्यक्षांकडे लेखी खुलासा करावा अन्यथा कारवाई अटळ आहे,' असा इशारा या नोटीशीत देण्यात आला आहे. मात्र या स्टिंग ऑपरेशनमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत सीडीमधील आवाज आपला नसल्याचा दावा पुरोहित यांनी केला आहे. तसेच हा आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही पुरोहित यांनी म्हटले आहे.