शिवसेनेची टीका लागली भाजपाच्या जिव्हारी
By admin | Published: January 23, 2017 04:57 AM2017-01-23T04:57:38+5:302017-01-23T04:57:38+5:30
महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी सुरू असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी बोचरी टीका भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार मनोज कोटक, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजपा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत २२७ जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा या वेळी आढावा घेण्यात आला असून, मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या पारदर्शक कारभाराबाबतचे जाहीरनाम्यातील मुद्दे अंतिम करण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
या वेळी युतीबाबत शिवसेना आणि भाजपा नेत्यांदरम्यान झालेल्या बैठकांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. भाजपाला केवळ ६० जागा सोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला. हा प्रस्ताव म्हणजे भाजपाचा अपमान आहे. त्यामुळे ही आता पक्षाच्या मानसन्मानाची लढाई बनली आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. रात्री उशिरा राज्यातील पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक बोलावण्यात आली.
शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये युतीसंदर्भातील तिसरी बैठक शनिवारी पार पडली, पण या बैठकीत भाजपाकडून देण्यात आलेला ११४ जागांचा प्रस्ताव फेटाळत, केवळ ६० जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखविली. त्यामुळे युतीबाबतच्या तिसऱ्या बैठकीतही तणाव कायम होता.
दरम्यान, भाजपाची मुंबईतील ताकद पाहता, ६० जागाही जास्त आहेत. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दानशूर आहेत. त्यामुळे त्यांनी जागा दिल्या, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (प्रतिनिधी)
चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात-
एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून मुखपत्राच्या माध्यमातून सतत भाजपावर शरसंधान सुरू असल्याने पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. तशात सेना भाजपाला सन्मानजनक जागा सोडण्यास तयार नसल्याने युतीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.