भाजपाने केली शिवसेनेवर कुरघोडी
By admin | Published: December 23, 2016 05:32 AM2016-12-23T05:32:28+5:302016-12-23T05:32:28+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला होत असताना राज्यभरातील नद्यांचे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला होत असताना राज्यभरातील नद्यांचे पाणी अन् किल्ल्यांची माती असलेले कलश उद्या शुक्रवारी मुंबईत फिरविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने हा कार्यक्रम होत असला तरी त्याआडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी भाजपा साधत असल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्यभरातील जल व मृद कलश शुक्रवारी सकाळी १० वाजता चेंबूर नाक्यावर एकत्र आणले जातील. तेथून सकाळी ११ला या कलशांसह रथ निघेल. त्यात सुमारे एक हजार दुचाकीस्वार हाती भगवे झेंडे घेऊन असतील. ही कलशयात्रा सायंकाळी ४च्या सुमारास गेट वे आॅफ इंडियाला पोहोचेल. तेथे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे कलश सुपुर्द करण्यात येणार आहेत. हे कलश जिल्ह्याजिल्ह्यातून आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली असली तरी ते आणणाऱ्यांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचाच भरणा असणार आहे. उद्याच्या कलश यात्रेच्या आयोजनात शिवसेनेचे मंत्री वा नेत्यांचा सहभाग नाही. भाजपा, भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उत्साहाने कलशयात्रेत उतरणार आहेत. २४ डिसेंबरच्या शिवस्मारक भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पत्रपरिषद झाली.
स्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे उपस्थित होते. या तिघांसह गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ.राज पुरोहित यांनी आज भूमिपूजनस्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. २४ तारखेला दुपारी ३ वाजता भूमिपूजन समारंभ अरबी समुद्रातील बेटावर होईल आणि तेथून मोदी आणि अन्य पाहुणे मोटारीने बीकेसीतील सभास्थळी जातील. या मार्गावरही पोवाडे, साहसी खेळ आदी कार्यक्रमांनी त्यांचे स्वागत केले जाईल. शिवराज्यभिषेकाच्या वेळी अठरापगड जातींच्या कलावंतांनी त्यांच्या कलागुणांचे दर्शन घडविले होते. स्मारकाच्या भूमिपूजनानिमित्त २४ तारखेला गिरगाव चौपाटीवर असेच कार्यक्रम होणार आहेत.
उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष!
शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बीकेसीमध्ये आयोजित समारंभात मोदी यांचे मुख्य भाषण होईल. राज्यपाल सी.विद्यासागर राव अध्यक्षस्थानी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य पाहुणे असतील. निमंत्रण पत्रिकेत सन्माननीय अतिथींमध्ये पहिले नाव हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहे. मात्र, पत्रिकेत त्यांचे पद हे कार्याध्यक्ष, शिवसेना असे लिहिलेले आहे.
ठाकरे यांच्याशिवाय, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रामदास आठवले, खा.उदयनराजे भोसले आणि खा.संभाजीराजे भोसले हेही विशेष सन्माननीय अतिथी असतील. (विशेष प्रतिनिधी)
शिवस्मारकात मच्छीमारांना रोजगार
शिवस्मारक उभारताना मच्छीमार बांधवांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, या स्मारकात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीमध्ये मच्छीमार बांधवांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री तावडे यांनी दिली. स्मारकाच्या निमित्ताने मच्छीमार बांधवांच्या तक्रारी निकालात काढण्यासाठी शासन-मच्छीमार प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाईल.