Tauktae Cyclone: “आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 03:58 PM2021-05-23T15:58:10+5:302021-05-23T16:00:16+5:30
Tauktae Cyclone: मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई: गतवर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर अलीकडेच तौक्ते चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भागातील अनेक घरांचे, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करून मदतीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over tauktae cyclone)
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर आणि त्यांच्या घोषणेवर टीका केली आहे. एकामागून एक ट्विट्स करत त्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे.
शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिले
ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिले, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा…२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 23, 2021
दरम्यान, तौत्के चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांची मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. कोकणात फार मोठे नुकसान झालं आहे आणि नुकसानग्रस्तांना आपण पुन्हा उभे केले पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना भरीव मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांची मदत होणं गरजेचं आहे, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले.