राऊतजी, ‘हे’ तर गेल्या वर्षभराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं धोरण; भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 01:25 PM2021-04-22T13:25:03+5:302021-04-22T13:27:32+5:30
पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई: देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून, एका दिवसातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपार गेली आहे. कोरोना नियंत्रणासाठी कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या कठीण काळातही आरोप-प्रत्यारोपांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. सामनामध्ये पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. (keshav upadhye replied sanjay raut over pm modi statement)
सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादावरून निशाणा साधण्यात आला. संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार होते, अशी टीका करण्यात आली होती. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले आहेत.
सामना -संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार,@rautsanjay61 जी हे तर@OfficeofUT यांचे गेल्या वर्षभराचे धोरण आहे. कोरोनाचा हाहाःकार सुरू असताना महाराष्ट्रातील जनतेला तुमच तुम्ही पहा, तुमच आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 22, 2021
वर्षभर मुख्यमंत्र्यांचेही तेच धोरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या वर्षभराचे धोरण आहे. कोरोनाचा हाहाःकार सुरू असताना महाराष्ट्रातील जनतेला तुमचं तुम्ही पहा, तुमचा आजार तुम्हीच निस्तरा असच तर मुख्यमंत्री सांगत आहेत, असा पलटवार उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
धक्कादायक! सिव्हिल रुग्णालयातून १२७० कोव्हिशिल्ड व ४४० कोव्हॅक्सिन लसींची चोरी
मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले?
केंद्र सरकार मदत करत आहे. पण मुख्यमंत्री कितीवेळा दिलासा द्यायला बाहेर पडले? कोरोना लढाईत कोणती ठोस पावले उचलली? बेड, ॲाक्सिजन, रेमडेसीव्हर यासाठी काय नियोजन वर्षभर केले? काय मदत गोरगरीबांना दिली?, अशी प्रश्नांची सरबत्ती दुसऱ्या एका ट्विटमधून करण्यात आली आहे. वर्षभरातील बदल्या पहा, त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते तर दुरावस्था झाली नसती, अशी खोचक टीका यावेळी करण्यात आली.
दरम्यान, १ मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून, अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. जिल्हाबंदी, रेल्वे आणि मेट्रो प्रवासबंदी यांसारखे अनेक नियम जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध लावूनही कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.