“बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:52 PM2022-05-11T15:52:54+5:302022-05-11T15:54:42+5:30
शिवसेनेनं आधी उन्हात राणा दाम्पत्यांसाठी घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी, असा टोला भाजपने लगावला आहे.
मुंबई: १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केलं आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असल्याचं शिवसेनेनं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यावरून आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात? असा थेट सवाल भाजपने विचारला आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असा हुंकार देणाऱ्या शिवसेनेनं आधी उन्हात राणा दाम्पत्यांसाठी घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी, असा टोला केशव उपाध्ये यांनी यावेळी लगावला आहे.
त्यांच्या हाताचं काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचं नाव घेणंही पाप
एसटी कर्मचाऱ्यांनी ५ महिने संप पुकारला. अनेक कर्मचाऱ्यांचे डोळ्यादेखत आयुष्य संपवलं. त्यांच्या हाताचं काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचं नाव घेणंही पाप ठरेल. बॅनरवर हिंदुत्व शब्द लिहिला परंतु चेहऱ्यावर असलेला पुरोगामी बुरखा उतरवला. ‘ह्दयात सत्ता आणि डोक्यात सत्तेची हवा’ असणाऱ्या मुख्यमंत्रिपदासाठी भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी करून हिंदुत्व कधीच सोडलं. आता केवळ उरला आहे तो केवळ दिखावापणा. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात? अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे.
दरम्यान, आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यानंतर आता शिवसेनेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसंच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही त्यावर नमूद करण्यात आलंय.