"रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे 'भ्रष्टाचार्यांचा महामेळा'"; भाजपा नेत्याचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:06 PM2024-04-01T15:06:43+5:302024-04-01T15:33:58+5:30
इंडिया आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेला इंडिया आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला आहे.
"या महामेळ्यात घोटाळ्याचे अनेक आरोप असलेली नामवंत मंडळी एकत्र आली होती. देश लुटण्याचा आरोप असणारे अनेक नेते दिल्लीतल्या मेळाव्यात एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही या महामेळ्याला उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार केला आहे."
"इंडिया आघाडीने मात्र ‘भ्रष्टाचारी बचाव’ असा नारा देऊन आपले खरे रूप देशाला दाखवले आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कितीही कांगावा केला तरी न्यायव्यवस्थेने त्यांच्यावरच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. कितीही कांगावा केला तरी या नेतेमंडळींना लोकसभा निवडणुकीत आपापल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर मतदारांना उत्तरे द्यावी लागणार आहेत" असं म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
उपाध्ये यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाढा वाचून दाखवला. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, खा.संजय सिंह या मंडळींना न्यायालयाने जामिन देण्यास नकार दिला आहे. यावरूनच त्यांचा घोटाळ्यातील सहभाग सिद्ध होतो. सोनिया गांधी, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कोरोना काळात अनेक घोटाळे घडले. दिल्लीमध्ये घडलेला मद्य घोटाळा महाराष्ट्रातही करण्याची तयारी ‘मविआ’ सरकारच्या काळात चालू होती का, याची उत्तरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आगामी काळात द्यावी लागणार आहेत, असं म्हणत़ केशव उपाध्ये यांनी हल्लाबोल केला आहे.