Uddhav Thackeray vs BJP: "शिल्लकसेना आता अधिकृतपणे शरद पवार-सोनिया गांधी यांच्याकडे 'आऊटसोर्स' करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 01:39 PM2022-09-30T13:39:25+5:302022-09-30T13:40:01+5:30
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने लगावला टोला
Uddhav Thackeray vs BJP: महाराष्ट्रात सध्या दसरा मेळाव्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. दसरा मेळावा जसजसा जवळ येतोय तसे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून वातावरण निर्मितीला सुरूवात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटांचे दसरा मेळाव्याचे टीझर रिलीज करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच दोन्ही गटातील नेतेमंडळी अनेक मोठमोठी विधाने करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला जरी उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली असली तरी शिवसेनेत दोन गट पडल्याने गर्दी जमवणे व शक्तीप्रदर्शन करणे क्रमप्राप्तच आहे. अशा वेळी एका वृत्तानुसार, काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनात शिवसैनिकांनी सहभागी झाल्यास, दसरा मेळाव्याला काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावरून भाजपाचे केशव उपाध्ये यांनी त्यांना टोला लगावला आहे.
एका वृत्तानुसार, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार असल्याचे सांगितले जात आहे. पण यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे. जर दसरा मेळावा साठी काँग्रेस कार्यकर्ते यावेसे वाटत असतील तर शिवसैनिकांनाही राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात सक्रीय सहभाद नोंदवावा लागेल, असा काँग्रेसने प्रस्ताव ठेवलाय. या वृत्तावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. "भारत जोडो यात्रेसाठी शिल्लक सैनिकांची कुमक तर शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर.उद्धवराव, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्रीपद बळकावून झाले. आतादसऱ्याचे विचारांचे सोने पवार-सोनियांकडे गहाण. त्यापेक्षा शिल्लकसेना अधिकृतपणे त्यांच्याकडे आऊटसोर्स करा", असा टोला लगावत केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या कार्यप्रणालीवर बोचरी टीका केली आहे.
मनसेनेही लगावला होता टोला
"नवाब सेनेचा 'टोमणे मेळावा' काँग्रेसच्या जीवावर होणार तर ... बुडत्याला काडीचा आधार ... तरी म्हटलं नवाब सेनाप्रमुख, छोटे नवाब व त्यांच्या सेनेकडून 'पीएफआय'बाबत अधिकृत वक्तव्य अजून का नाही आले ते ... हिरवी मशाल घेवून टोमणे मेळावा होणार तर ...", असा खोचक टोला मनसेचे गजानन काळे यांनी ट्वीट करुन लगावला.