"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:14 AM2023-08-28T10:14:43+5:302023-08-28T10:19:54+5:30
BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरुन टीकास्त्र सोडलं. "एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे."
"मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. य़ा टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे बरं झालं" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घ्यावी लागेल"
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत! उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं! मतदार विचारत नाहीत, साथीदार साथ देत नाहीत अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल असे वाटते. बघा तुमच्याकडे कोणी मिळते का?" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का?"
उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. "शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काही कतृत्व नाही. भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का? हे नामार्द आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते. इतर पक्षांचे नेते चोरणारे आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद, याला नामर्द म्हणतात" अशी टीकाही ठाकरेंनी केली.