Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा रडारवर? शिंदे-भाजप सरकार मोठा निर्णय घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 10:12 AM2022-08-24T10:12:20+5:302022-08-24T10:14:18+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला. आता डावा हातही जेलमध्ये जाणार, असा सूचक इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
Maharashtra Political Crisis: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर असून, अनेकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अलीकडेच पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आर्थर रोड तुरुंगात मुक्कामी आहेत. यातच आता एका भाजप नेत्याने संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एक नेता रडावर असल्याचा सूचक इशारा दिला आहे. यामुळे संजय राऊत यांच्यानंतर कुणाचा नंबर लागतो, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात सूचक विधान केले आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला. आता डावा हातही जेलमध्ये जाणार. समझने वाले को इशारा काफी है. या संदर्भात फडणवीस-शिंदे सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगत खळबळ उडवून दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत कोविड सेंटरच्या कामात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा पैसा कुठून आला आणि कुठे गेला हे लवकरच जाहीर करणार आहे. चोरी केलेला चोरीचा माल परत करावाच लागेल व सगळ्यांचा हिशोब होणार असा इशारा सोमय्यांनी दिला.
इतका अहंकार चांगला नाही
नेत्यांनादेखील अहंकार असतो. पण इतका अहंकार चांगला नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार हे माफियाराज होते. एका कुटुंबाचे भर चौकात मुंडन केले. माजी नौदल अधिकाऱ्याने एक पोस्ट टाकली, तर त्यालाही घरी जाऊन मारले. माझ्या आई, बायको व मुलाला जेलमध्ये टाकायला निघाले होते. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. पण ज्यांनी हे आरोप केले, जेलमध्ये टाकण्याच्या वल्गना केल्या, तेच जेलमध्ये गेले, असा टोला किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांचा अप्रत्यक्षरित्या लगावला.
दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील दोन रिसॉर्टवर कारवाई करत, ती जमीनदोस्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल ६३ लाखांचा दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.