Maharashtra Politics: “शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे की संजय राऊत निर्दोष आहेत”; भाजपचे खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:07 PM2022-09-22T18:07:20+5:302022-09-22T18:08:56+5:30
Maharashtra News: शरद पवारांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय, अशी टीका भाजपकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Politics: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, यानंतर आता भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार यांना आव्हान दिले आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांना यासंदर्भातील पत्र भातखळकर यांनी लिहिल्याची माहिती समोर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक असे दावे-प्रतिदावे सुरु आहेत. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्राचाळ प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
शरद पवारांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय
खरे म्हणजे ईडीने कधी आरोप केलाच नाहीय. शरद पवार विषय दुसरीकडे फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय. चार्टशीट संजय राऊतांवर आहे. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे ना की संजय राऊत निर्दोष आहेत. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावे की त्यांचे जे कौटुंबिक स्नेही असणारे वाधवान कुटुंबीय निर्दोष आहेत, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
दरम्यान, शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे की प्रवीण राऊत निर्दोष आहेत. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे की संजय राऊतांनी घेतलेली संपत्ती आणि (कमावलेला) पैसा निर्दोष (मार्गाने कमावलेला) आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. तसेच अनिल परब यांच्यासंदर्भातील दापोलीतील रिसॉर्टवर दसऱ्यापासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.