“देवेंद्रजी मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचं सरकार”; भाजपचे साईचरणी साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:08 PM2022-06-22T19:08:32+5:302022-06-22T19:09:34+5:30
भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत खदखद बाहेर पडली, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.
शिर्डी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. शिवसेनेने परत येण्यासाठी अल्टिमेटम दिलेले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून, शिवसेनेतील आणखी काही आमदार गुवाहाटीला गेल्याचे समजते. दुसरीकडे, भाजपच्या काही नेत्यांनी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, याबाबत साईचरणी साकडे घातले.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी शिर्डीत हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे त्यांनी साईचरणी घातल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मतदारसंघासाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांमध्ये खदखद होती. निधी मिळत नसल्याचे अनेक शिवसेना आमदारांनी बोलून दाखवले. मुख्यमंत्री त्यांचा असताना निधी मिळत नसेल तर सेना आमदारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या सर्व आमदारांना मनापासून शुभेच्छा असे कथोरे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते
भाजप ज्या दिवशी सत्ता स्थापन करेल त्यादिवशी आणखी आमदार जोडले जातील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते आहेत. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बरोबर आहेत. मग शिवसेना राहिली कुठे? शिवसेनेत किती खदखद आहे हे आता स्पष्ट झाले आहे. ही भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत त्यांची खदखद बाहेर पडली. हे सरकार पाडू असे फडणवीस कधीही म्हणाले नाही. त्यांच्या कर्माने हे सरकार पडेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि ते पडलेय, असे चित्र आहे, असे कथोरे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आमच्याकडे सुमारे ४५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार पुढे जात आहोत, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.